मुुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एस.टी. महामंडळ येत्या 24 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3 हजार 500 बसेस सोडणार आहे.
या लांब पल्ल्याच्या जादा वाहतूकीसोबतच स्थानिक स्तरावर आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत. 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान एस.टी.ची 10 टक्के हंगामी दरवाढ, एस.टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार, गर्दीच्या हंगामात करण्याचा अधिकार, राज्य परिवहन प्राधिकरणानं एस.टी.ला दिला आहे. त्यानुसार महसुल वाढीच्या दृष्टीनं 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय दरवर्षीप्रमाणे या हंगामातही एसटीनं घेतला आहे. त्यानुसार बसेसची 10 टक्के भाडेवाढ 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. ही भाडेवाढ 5 नोव्हेंबर पर्यंत राहील.
सदर भाडेवाढ, साधी, निमआराम आणि शिवशाही-आसन या बसेसना लागू राहील. ही भाडेवाढ, शिवशाही-शयनयान, शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला लागू होणार नाही. एस.टी. महामंडळात कार्यरत असणाऱ्या सुमारे १ लाख १० हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे रुपये 2 हजार 500 आणि रुपये 5 हजार इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून मिळणार आहे.
आचारसंहिता अद्यापही लागू असल्यानं याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, आयोगाची परवानगी मिळताच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येईल अशी घोषणा, परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. यासोबतच केंद्र आणि राज्यशासनाप्रमाणे देय असलेला 3 टक्के महागाई भत्ता यावर्षी 1 जानेवारी पासून देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून त्यापैकी ऑक्टोबरच्या वेतनामध्ये सदर 3 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे.
जानेवारी ते सप्टेंबर पर्यंतचा थकित महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल, असंही रावते यांनी स्पष्ट केलं.