मुंबई (वृत्तसंस्था) : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काढलेले उद्गार अवमानकारक असल्याचा आरोप करत भाजपानं आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. मुंबईत दहिसर रेल्वे स्थानकाबाहेर आमदार मनिषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आणि घोषणा दिल्या.

भाजपानं आज नाशिक शहरात निदर्शनं करत अजित पवार यांचा निषेध केला. द्वारका चौकात झालेल्या निदर्शनात भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या तर रविवार कारंजा इथं आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं झाली. सिंधुदुर्ग  भाजप महिला मोर्चानं कुडाळ इथं अजित पवार यांचा निषेध केला. भाजप महिलाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपानं सातारा इथं अजित पवार यांचा  निषेध  प्रतिमा दहन करून केला.

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं महसूलमंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली आज निषेध मोर्चा निघाला . या मोर्चाचं रुपांतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर सभेत झालं. छत्रपती संभाजी महाराज सदैव ‘धर्मवीरच’ असतील असं प्रतिपादन विखे पाटील यांनी केलं. पवार यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. पुणे शहर भाजप युवा मोर्चानं खंडोजीबाबा चौकात निदर्शनं केली. त्या वेळी ते बोलत होते.