मुुंबई : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांवरुन जनतेने दिलेल्या स्पष्ट कौलाबद्दल भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांन जनतेचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल यावर मात्र अद्याप प्रश्नचिन्ह आहे. ठाकरे यांनी भाजपासह युतीच्या वेळी झालेल्या 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली, तर मुख्यमंत्र्यांनी सत्ता महायुतीचीच असेल असा विश्वास व्यक्त केला. सत्तेसाठी सरकारमधे सामील होण्याची इच्छा 15 जणांनी आपल्याजवळ व्यक्त केल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं.

शिवसेना आणि भाजपामधल्या बंडखोरांमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 2014 च्या तुलनेत भाजपानं कमी जागांवर उमेदवार उभे केले. त्यामानाने विजयाचं प्रमाण समाधानकारक असल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मतदारांचे आभार मानले. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह आणि युतीमधल्या इतर घटकपक्षांच्या नेत्यांचेही त्यांनी आभार मानले. साता-यातून उदयनराजे भोसले, आणि परळीतून पंकजा मुंडे यांच्यासह काही अन्य नेत्यांच्या पराभवाची कारणं येत्या काही दिवसात विचारात घेतली जातील, असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.