मुंबई : सर्व देशांनी घातलेल्या बहिष्काराची पर्वा न करता तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन जगाला भारताची ताकद दाखवली. त्यांनी भारत देशाला आत्मनिर्भर बनविले. अटलजींच्या मार्गावर चालून देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू या, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वांद्रे येथील हॉटेल रंगशारदामध्ये दीप कमल फाऊंडेशनतर्फे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त श्री.फडणवीस यांना अटल सम्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री आशिष शेलार, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, तमीळ सेलवन, माजी आमदार राज पुरोहित, संजय पांडे, आयोजक अमरजीत मिश्र आदी उपस्थित होते.

अटल महाकुंभ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जीवनात ज्यांचे आकर्षण होते, त्यांच्या नावाने पुरस्कार असल्याने तो जड अंतःकरणाने स्वीकारत आहे. हा सन्मान नसून जबाबदारी आहे. यापुढे राजकीय, सामाजिक जीवनात चूक करून चालणार नाही. केवळ समाज आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून काम करायचे आहे. यामुळे हा पुरस्कार प्रेरणा देतो.

अटलजींनी कोणत्याही देशाची पर्वा न करता देशाला अणू संपन्न केले. प्रत्येक खेड्यापर्यंत रस्ता हे स्वप्न सत्यात उतरवले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना त्यांनी सुरू केली. कवी मनाच्या व्यक्तीच्या विचारावर देश सर्वोच्च शिखरावर पोहोचत आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही नवभारत निर्मितीचे स्वप्न पाहून देशाला उंचीवर नेवून ठेवले आहे. जगात भारताची ओळख निर्माण केली. भारतासोबत संबंध वाढविण्यासाठी अनेक देश येत आहेत. जी-20 मध्ये भारताला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईचा चेहरामोहरा बदलायचा असून 500 कामे मुंबईत सुरू आहेत. मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

यावेळी अटल महाकुंभ कार्यक्रमात अटल गीतगंगा या अटलजी यांच्या कवितेवर आधारित कार्यक्रमात व्हायोलीन वादक सुनीता भुयान यांनी वादन आणि कवितेचे गायन केले. लेखक, गायक हरीश भीमानी यांनीही आज सिंधू ज्वार उठा…. ही अटलजी यांची कविता गाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

यावेळी आमदार आशिष शेलार यांनी मुंबई आणि अटलजी यांचे नाते स्पष्ट केले. प्रास्ताविक अमरजीत मिश्र यांनी केले.