नवी दिल्ली : देशभरात विधानसभेच्या ५१ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला १६ तर काँग्रेसला १४ जागा, लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लोकजन शक्ती पार्टीनं समस्थीपूरची तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं साता-याची जागा जिंकली, हरियाणा विधानसभेच्या 90 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
भाजपा सर्वाधिक 40 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी भाजपाला बहुमतासाठी सहा जागा कमी पडत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला 31, जननायक जनता पार्टीला 10, INLD पक्षाला एक, हरयाणा लोकहित पार्टीला एक तर इतर पक्षांनी 7 जागा मिळवल्या आहेत.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे करनाल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून काँग्रेसचे उमेदवार रणदीप सिंग सुरजेवाल हे खैताल मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. भाजपाच्या लीला राम यांनी त्यांचा पराभव केला. माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा हे गरही सांपला किलोई मतदारसंघातून निवडून आले आहेत तर, जे.जे. पी पक्षाचे दुष्यंत चौटाला हे उचाना कलान इथुन निवडुण आले.
देशभरात १७ राज्यांमध्ये विधानसभेच्या ५१ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला १६ तर काँग्रेस ला १४ जागा मिळाल्या आहेत. लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लोकजन शक्ती पार्टीने बिहार मधली समस्तीपूरची जागा जिंकली तर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातल्या साताऱ्याच्या जागेवर विजय प्राप्त केला. उत्तरप्रदेशमधल्या ११ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपानं ७ जागा जिंकल्या.
बिहारमधल्या ५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला दोन तर संयुक्त जनता दल, एम आय एम आणि अपक्षाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं. गुजरातमध्ये ६ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला आणि काँग्रेस ला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. पंजाब मधल्या ४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला तीन तर शिरोमणी अकाली दलाला एक जागा जिंकता आली.
आसाममधल्या ४ जागांसाठीचे निकाल देखील जाहीर झाले आहेत. यात भाजपाला तीन आणि अखिल भारतीय संयुक्त लोकशाही आघाडीला एक जागा मिळाली. हिमाचलमधल्या दोन्ही जागांवर भाजपनं विजय प्राप्त केला. पुद्दुचेरी ची एक जागा काँग्रेसनं जिंकली. केरळातल्या ५ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि कम्युनिष्ट पार्टीने प्रत्येकी दोन तर इंडियन मुस्लिम लिगला एक जागा जिंकता आली.
अरुणाचल प्रदेशमधल्या एका जागेवर अपक्षांना बाजी मारली. तामिळनाडू मधल्या दोन्ही जागांवर अण्णा द्रमुकनं वर्चस्व स्थापित केलं. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीनं तेलंगणामधली जागा जिंकली. सिक्कीम मधल्या तीन जागांपैकी दोन जागा भाजपानं तर एक जागा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं जिंकली. मध्य प्रदेश मधल्या एका जागा काँग्रेसनं जिंकली.
राजस्थान मधल्या दोन जागांपैकी एक जागा काँग्रेसला तर दुसरी जागा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीला मिळाली. ओदिशामधली जागा बिजू जनता दलानं तर छत्तीसगड मधली जागा काँग्रेसनं जिंकली. मेघालायची एकमेव जागा संयुक्त लोकशाही पार्टीनं जिंकली.