मुुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपा- शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं असून हरयाणामध्ये भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा- शिवसेना युतीला 161 जागा मिळाल्या असून त्यापैकी भाजपानं 105 आणि शिवसेनेनं 56 जागा जिंकल्या आहेत.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 98 जागा मिळाल्या असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 54 तर काँग्रेसनं 44 जागा जिंकल्या. उर्वरित 29 जागांपैकी लहान पक्षांनी 13 आणि एमआयएम आणि समाजवादी पक्षानं प्रत्येकी दोन जागा जिंकल्या तर बहुजन विकास आघाडीनं तीन जागा मिळवल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, शिवसेनेचे युवा नेते प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या असल्या तरी लढवलेल्या जागांच्या तुलनेत मिळालेल्या जागा आणि भाजपाला झालेल्या मतदानाची वाढलेली टक्केवारी पाहता ही कामगिरी चांगली असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं. भाजपा प्रणीत महायुतीला स्पष्ट आणि निर्णायक जनादेश दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले आहेत.

भाजपा आणि शिवसेना यांच्यात सत्तावाटपाबाबत पूर्वी जे काही ठरलं आहे, त्यानुसारच निर्णय घेतला जाईल, असं फडनवीस यांनी सांगितलं आहे. राज्यात आपला पक्ष आणि भाजपा पुढलं सरकार स्थापन करतील आणि दोन्ही पक्ष पूर्वी ठरल्याप्रमाणे पन्नास पन्नास टक्के भागीदारीच्या फॉर्म्युल्याचाच वापर करतील, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. नवं सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांसोबत शिवसेना हातमिळवणी करण्याची शक्यता त्यांनी फेटाळली.