नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री तीन दिवसांच्या मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी काल मनधू इथं पोहोचले. मालदीव आणि भारत या दोन देशांमधलं सहकार्य वाढवण्याबाबत आणि भारताच्या आर्थिक मदतीनं मालदीव इथं सुरू असलेल्या विविध विकास कामांबद्दल त्यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला रशीद यांच्याशी चर्चा केली.
दोन्ही देशांदरम्यान झालेले सामंजस्य करार हे विकास क्षेत्रातली दोन्ही देशांची बळकट भागीदारी अधोरेखित करतात असं ते म्हणाले. मालदीव राष्ट्रीय विद्यापीठ आणि कोचीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठादरम्यान झालेल्या सामंजस्य कराराबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.
मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाला मदत करण्यासाठी दोन समुद्री रुग्णवाहिकाही त्यांनी मालदीवकडे सुपूर्द केल्या.भारतानं मालदीवमध्ये 45 पैकी 23 महत्त्वाची विकास कामं पूर्ण केली आहेत, असं जयशंकर यावेळी म्हणाले. तसंच अशा इतर विकास कामांसाठी अतिरिक्त 100 दशलक्ष मालदीवी रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली.