नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत नेहमीच पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध राखण्यासाठी इच्छुक राहिला आहे, मात्र त्यासाठी हिंसा आणि दहशतवादापासून मुक्त वातावरण असणं गरजेचं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांचा समावेश करण्याचा भारताचा प्रयत्न कायम राहील, असं ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियात काही हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड झाल्याच्या अलिकडच्या घटनांचा भारत निषेध करत असून ऑस्ट्रेलियातले नेते आणि तिथल्या धार्मिक संघटनांनीही या घटनांचा जाहीररित्या निषेध केला आहे, असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात ऑस्ट्रेलियातल्या भारतीय महावाणिज्य दूतांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली असून आरोपींविरूद्ध तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बीबीसीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केलेला माहितीपट पूर्वग्रहदूषित, वस्तुनिष्ठतेचा अभाव असलेला आणि वासाहतिक मानसिकता दाखवणारा असल्याचं सांगत बागची यांनी या माहितीपटाचा निषेध केला. तिसरं अटलबिहारी वाजपेयी व्याख्यान येत्या २३ तारखेला आयोजित केलं जाणार असल्याचं बागची यांनी सांगितलं.