नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “इनकोव्हॅक” या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या जगातल्या पहिल्या कोविड प्रतिबंधक लसीचं अनावरण काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते झालं. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत बायोटेकनं, जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहकार्यानं ही लस विकसित केली आहे.
प्राथमिक स्तरावरच्या दोन मात्रा आणि हेट्रोलोगोस वर्धक मात्रा; म्हणजेच आधी घेतलेल्या कुठल्याही प्रकारच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीनंतर घेता येणारी वर्धक मात्रा म्हणून वापर करण्यासाठी या लसीला मान्यता दिली जाणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. नाकावाटे घ्यायची जगातील पहिली लस भारतानं विकसित करणं, ही आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला गौरवास्पद मानवंदना आहे; अशा शब्दात डॉ मनसुख मांडवीय यांनी भारत बायोटेक आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या संशोधकांचं अभिनंदन केलं आहे.