नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं अवघ्या दोन वर्षांत चार स्वदेशी लसी विकसित केल्या आहेत, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. जैवतंत्रज्ञान विभागानं “मिशन कोविड सुरक्षा” या उपक्रमाद्वारे चार लसी उपलब्ध करून दिल्या आहेत, कोवॅक्सिन या लसीचं उत्पादन वाढवलं आहे आणि भविष्यातील सुरळीत लसनिर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथे नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचं औपचारीक अनावरण केल्यानंतर जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश गोखले आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. झायकोव-डी, कॉर्बव्हॅक्स, जेमकोव्हॅक आणि इनकोव्हॅक, या त्या चार लसी, जैवतंत्रज्ञान विभागानं उपलब्ध केल्या आहेत.