पुणे : पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ‘ मदार ‘ या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित महोत्सवावर आपली मोहोर उमटविली आहे. तर यंदाचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बेल्जियम आणि फ्रान्स च्या  ‘तोरी अँड लोकिता’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. राज्यातील चित्रपट क्षेत्राच्या प्रगतीसाठी कोल्हापूरमध्ये  नवीन चित्रनगरी उभारण्याची , तसंच ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’च्या धर्तीवर फिल्म इक्वीटी स्टॉक एक्सचेंज सुरू करणार असल्याची घोषणा काल झालेल्या या सोहोळ्यात राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जानू बरवा, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे, पुणे फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल  उपस्थित होते.