नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचं कामकाज एका महिन्याच्या मध्यांतरासाठी मार्चच्या १३ तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या भागाच्या शेवटच्या दिवशी विरोेधकांनी मल्लिकार्जून खरगे यांनी अदानी संदर्भात केलेल्या भाषणाचा काही भाग कामकाजातून काढून टाकण्याच्या मुद्द्यावर सदनात गदारोळ केला. सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर आम आदमी पार्टी आणि भारत राष्ट्र समितीनं दाखल केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावर खरगे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग कामकाजातून वगळण्यात आला. याचा निषेध करणारा हा प्रस्ताव होता. अध्यक्षांनी दबावाला बळी पडून हे कृत्य केल्याचा खरगे यांचा आरोप धनखड यांनी फेटाळून लावला. विरोधी सदस्यांनी हौद्यात येऊन अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची मागणी करत जोरदार घोषणा दिल्या. अध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही विरोधकांनी घोषणा सुरुचं ठेवल्या. त्यानंतर अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतरही घोषणाबाजी चालूच राहिली. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी काँग्रेस खासदारांचं निलंबन मागं घेण्याची मागणी केली, त्यावर विरोधकांनी सदनाची माफी मागावी, असं वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हणताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. मग अध्यक्षांनी १३ मार्च पर्यंत सदनाचं कामकाज तहकूब केलं. लोकसभेत मात्र कामकाज सुरळीत सुरू होतं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिला टप्प्याचा आज शेवटचा दिवस असून, दुसरा टप्पा १३ मार्चपासून सुरु होणार आहे.