नवी दिल्ली : चंडीगढ इथं उद्या आयोजित शपथविधी सोहळ्यात मनोहरलाल खट्टर उद्या मुख्यमंत्रीपदाची तर दुष्यन्त  चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जननायक जनता पक्षासोबत आघाडी करून हरयाणामध्ये भाजपा सरकार स्थापन करणार आहे.

भाजपाला सहा अपक्षांनी ही पाठिंबा दिला असून, हरयाणा लोकहित पक्षाचे एकमेव आमदार गोपाळ कांडा यांनीही भाजपाला समर्थन दिलं आहे. मात्र गोपाळ कांडा यांचं समर्थन भाजपनं नाकारलं आहे. आज भाजपाच्या बैठकीनंतर भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.

त्यापूर्वी  आज हरयाणात भाजपाच्या विधिमंडळ  पक्षनेतेपदी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची निवड झाली आहे. हरयाणामध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या चंडीगढ़  इथं  झालेल्या बैठकीत खट्टर यांची एकमतानं निवड करण्यात आली.

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते रवीशंकर प्रसाद आणि भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंग, या बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते.  या बैठकीनंतर मनोहरलाल खट्टर ,यांनी हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव आर्य यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला.