नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे सरकारी योजना या वेगाने कार्यान्वित होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बेळगावी इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज किसान सन्मान योजनेचा १६ हजार कोटी रुपयांचा १३ वा हप्ता वितरित केला. या योजनेद्वारे हे पैसे देशभरातल्या ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत. कर्नाटकच्या बेळगावी इथं आयोजित कार्रक्रमात हा हप्ता वितरित केला गेला.
आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नुतनीकरण केलेल्या बेळगावी रेल्वे स्थानकाच आणि रेल्वेच्या दूहेरी मार्गाचंही लोकार्पण त्यांनी केलं. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यावेळी कर्नाटकातल्या २ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध योजनांची पायाभरणीही करण्यात आली. डबल इंजिन सरकारच्या फायद्याबद्दल बोलतांना त्यांनी जलजीवन मिशनचं उदाहरण दिलं. यामुळे कर्नाटकच्या ग्रामीण भागातला नळावाटे करण्यात आलेला पाणीपुरवठा २५ टक्क्यावरुन ४० टक्क्यावर गेला असल्याचंही त्यांनी सांगितलं. २०१४ मध्ये कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केवळ २५ हजार कोटी रुपयांची तरतूद होती ती आता १ लाख २५ हजार कोटी रुपये झाल्याचीही ते म्हणाले.