नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज उत्तर प्रदेशातील बलिया येथील चिटबाडा गावात 6500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, बलियाला जोडणाऱ्या या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामामुळे लखनौहून पाटण्याला पूर्वांचल द्रुतगती मार्गाने अवघ्या साडेचार तासात पोहोचणे शक्य होणार आहे.
मंत्री म्हणाले की, बलिया येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला लखनौ, वाराणसी आणि पाटणा येथील मंडईंमध्ये सहज पोहोचू शकेल. ते म्हणाले की, या महामार्गामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना वाराणसी, गाझीपूर आणि हल्दिया या तीनही मल्टी-मॉडल टर्मिनलचा थेट लाभ मिळेल. या कार्यक्रमा दरम्यान गडकरी यांनी बलिया-आरा दरम्यानच्या 1500 कोटी रुपये खर्चाच्या 28 किमी लांबीच्या नवीन हरित जोड मार्गाची घोषणाही केली.