नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२३ च्या मार्च ते मे महिन्यादरम्यान भारताच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र मध्य भारतात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा धोका संभवत नसल्याचं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. सी. भान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये दक्षिण भारत वगळता सर्वत्र सरासरी किमान तापमानापेक्षा अधिक तापमान संभवत असल्याचंही ते म्हणाले. २०२३ च्या फेब्रुवारीमध्ये सरासरी कमाल तापमान २९ पूर्णांक ५४ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. १९०१ पासूनचं हे उच्चांकी तापमान आहे. फेब्रुवारी महिन्यात ६८ टक्के कमी पाऊस झाल्याची माहितीही त्यांनी दिली.