नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा अभियाना अंतर्गत भारतीय वायुदलाची चार C-17 विमानं युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० नागरिकांना घेऊन आज सकाळी नवी दिल्ली जवळच्या वायुदलाच्या हिंडन विमानतळावर परतली. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट इथून भारतीय वायुदलाचं पहिलं विमान २०० भारतीय नागरिकांना घेऊन आज सकाळी वायुसेनेच्या हिंडन तळावर उतरलं. तसंच भारतीय वायुदलाची अन्य विमानं हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथून २१०, पोलंड इथून २०८ तर बुखारेस्ट इथून १८० भारतीय नागरिकांना घेऊन मायदेशी परतली. संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी मायदेशी परतलेल्या भारतीय नागरिकांचं स्वागत केलं तसंच त्यांच्याशी संवाद साधला. भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे  मायदेशी परत आणण्याच्या केंद्रसरकारच्या प्रयत्नांमध्ये आपली सेवा आणि सहकार्याचं योगदान दिल्याबद्दल भारतीय वायुदल, विमान चालक आणि सेना कर्मींचे आपण आभारी असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.