मुंबई (वृत्तसंस्था) : अनाथ असून देखील जीवनात शिक्षण प्राप्त करून प्रगतीची शिखरे गाठणाऱ्या यावेळी अमृता करवंदे, अभय, सुलक्षणा, नारायण इंगळे आणि मनोज पांचाळ या ५ युवक युवतींना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल तर्पण युवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अठरा वर्षावरील अनाथ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, भावनिक आणि आर्थिक पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या तर्पण फाउंडेशनतर्फे राजभवन इथं या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. १८ वर्षा नंतर या मुलांना अनाथालयातून बाहेर पडावं लागतं. त्यावेळी त्यांच्या समोर समस्यांचा डोंगर उभा असतो. अशा बालकांना तर्पण तर्फे व्यावसायीक आणि अन्य शिक्षण दिलं जातं. तर्पण तर्फे आतापर्यंत ५०० युवकांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे, तर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत भारतीय आदी मान्यवर उपस्थित होते.