नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय वायुदलाची आणखी १९ विमानं आज युक्रेनच्या शेजारी देशांमधून उड्डाण करणार असून या विमानांमधून ३ हजार ७२६ भारतीय नागरिकांना परत आणलं जाईल असं नागरी विमान उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. गंगा अभियाना अंतर्गत भारतीय वायुदलाची विमानं तसंच एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या ८ विमानांमधून बुखारेस्ट आणि बुडापेस्ट इथून भारतीय नागरिकांना घेऊन येतील. तसंच राजेज्जो इथून ३, सुकेवा इथून २ तर कोसिका इथून १ विमान भारतीय नागरिकांना घेऊन येण्यासाठी उड्डाण करतील असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.