नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेक इन इंडियामुळे अनंत शक्यता निर्माण झाल्या असून, सारं जग भारताकडे कारखानदारीचं शक्तीकेंद्र म्हणून बघत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज ‘उद्याच्या जगासाठी मेक इन इंडिया’ या विषयावर आयोजित वेबिनारमधे बोलत होते. देशात कारखानदारीचा मजबूत पाया उभारण्यासाठी सर्व संबंधितांच्या सहकार्यानं काम करण्यावर त्यांनी भर दिला. देशातल्या कारखानदारी क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातला वाटा सुमारे १५ टक्के आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाकरता महत्त्वाचे निर्णय घोषित केलेले आहेत, असं त्यांनी सांगितलं. दर्जाच्या बाबतीत जागतिक स्पर्धेत भारतीय उत्पादनं निर्दोष असली पाहिजेत. त्याचबरोबर जगापुढची पर्यावरणाची समस्या लक्षात घेता ही उत्पादनं पर्यावरणावर अजिबात विपरित परिणाम करणारी असू नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.