तिवारी दाम्पत्याच्या जागतिक पेटंटस नोंदणी विक्रमामुळे पीसीईटीच्या मुकूटात आणखी एक मानाचा तुरा
पिंपरी : भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत व्हावी यासाठी बौद्धिक संपत्ती, अधिकार आणि व्यवस्थापन संस्कृतीस देशात अनुकूल वातावरण निर्मितीची गरज आहे. पीसीईटीमध्ये संशोधनासाठी पुरक वातावरण आहे. सर्वसामान्यांपर्यंत संशोधन, पेटंटस्, कॉपीराइटस् यांचे महत्व पोहोचले पाहिजे. संशोधन करण्यासाठी फार मोठ्या पदव्यांची गरज नसते. ज्याला शालेय पातळीवरील मुलभूत विज्ञान माहित आहे, ज्याला वस्तू वा प्रक्रियेतील नेमकी त्रुटी चाणाक्षपणे हेरता येते आणि ज्याला अडचणीवर मार्ग शोधून काढण्याची संशोधनवृत्ती वाढली पाहिजे व या संशोधनातून छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभे राहिले पाहिजे त्यातूनच रोजगार निर्मितीस चालना मिळेल आणि आपला देश आर्थिक महासत्ता होऊ शकेल असा विश्वास पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅंड रिसर्चचे (पीसीसीओईआर) प्राचार्य डॉ. हरिष तिवारी आणि त्यांच्या पत्नी अमृता तिवारी यांनी भारतीय पेटंट आणि ट्रेडमार्क्स ऑफिस, मुंबई येथे एकाच दिवशी एकूण चौदा पेटंटसची नोंदणी करून एक अनोखा जागतिक विक्रम केला आहे. या विक्रमाची दखल घेऊन ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’ या संस्थेने उभयतांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरव केला. त्यानिमित्त पीसीईटीच्या कार्यालयात विश्वस्तांच्या वतीने तिवारी दाम्पत्याचे अभिनंदन करण्यात आले. तिवारी दाम्पत्याचा या जागतिक विक्रमाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी डॉ. तिवारी यांचे अभिनंदन केले.
डॉ. हरिष व अमृता यांनी दैनंदिन जीवनात रोज वापरण्यात येणारी काही यंत्रे, स्टेशनरी, व्यापारी वाहने (ट्रक) याबाबत सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर चिकित्सक दृष्टीकोन ठेवून संशोधन वृत्तीने उपाय शोधण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. यामध्ये ट्रकच्या इंजिनची कुलींग यंत्रणा, टि.व्ही., स्टेशनरी (सेलोटेप व कटर), घड्याळ यांवर संशोधन करुन त्याचे एकूण चौदा पेटंट एकाच दिवशी नोंदणी केले. डॉ. तिवारी यांच्या नावावर आतापर्यंत विविध क्षेत्रातील चाळीस पेटंटची नोंद झाली आहे. यापैकी स्टेशनरी (सेलोटेप व कटर) याचे लवकरच व्यवसायिक पातळीवर स्टार्टअप सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे.
पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी संस्थेच्या अध्यापकांना, विद्यार्थ्यांना आणि कर्मचारी वर्गाला पेटंटस, कॉपीराइटस, स्टार्टअप्स इत्यादींविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी नवसंशोधनासाठी दिलेल्या सततच्या प्रोत्साहनामुळे पेटंटस् व कॉपीराइटस् नोंदणीचे अनेक विक्रम पीसीसीओईआरच्या नावावर आहेत. पीसीसीओईआरमध्ये पेटंटस, कॉपीराइटस, स्टार्टअप्स वर ‘सिप्सीज 2019’ हि देशातील सर्वप्रथम आणि एकमेव परिषद डॉ. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती.