मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होत असून त्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी अर्थसहाय्य करावं अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जायकाचे अध्यक्ष डॉ. तनाका अखिको यांना केली आहे. आज सकाळी वर्षा निवासस्थानी जायकाचे अध्यक्ष डॉ तनाका अखिको, मुख्य प्रतिनिधी साईतो मित्सुनोरी आणि त्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्या वेळी त्यांनी ही विनंती केली. राज्य शासनाला जायकाचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही जायकाच्या अध्यक्षांनी दिली.
मुंबईतील भूमिगत मेट्रो, मुंबई-गोवा महामार्ग तसेच विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोर या व इतरही काही मोठ्या प्रकल्पांसाठी जायकानं अर्थसहाय करण्यावर चर्चा झाली. अशा मोठ्या प्रकल्पांना अर्थसहायाबाबत जायका आणि राज्य शासन यात समन्वय असावा यासाठी एक समन्वयन अधिकारी शासन नेमेल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितलं. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, आदी अधिकारी उपस्थित होते.