नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांचं देशातल्या लोकशाही संदर्भातलं विधान आणि अदानी समुहाच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पुन्हा सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र सुरू झालं तेव्हापासून सलग चौथ्या दिवशी या मुद्द्यावरुन गोंधळ झाला. लोकसभेत आणि राज्यसभेत कामकाज सुरू झालं तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसचे खासदार चेहऱ्यावर काळे कापड बांधून हौद्यात आले.
काँग्रेस, द्रमुक आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही अदानी समुहाच्या मुद्द्यावरुन याठिकाणी धाव घेतली. सत्ताधारी सदस्यांनी राहुल गांधी यांच्याकडून माफीची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. यानंतर विरोधीपक्षाच्या सदस्यांनी संसदेबाहेर मानवी साखळी तयार करत आंदोलन केलं. यात काँग्रेस, द्रमुक, आप, भारतीय राष्ट्र समिती, समाजवादी पक्ष, भाकप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात सत्ताधारी पक्ष व्यत्यय आणत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.