नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयानं अग्निवीरांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाणार असून त्यांना शारीरिक चाचणी परिक्षेतूनही सूट देण्यात येईल. नुकतंच गृहमंत्रालयानं अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलात देखील १० टक्के आरक्षण जाहीर केलं आहे.
गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार,अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत, तर इतर तुकड्यांसाठी तीन वर्षांपर्यंत शिथिल केली जाईल. सशस्त्र दलांमध्ये अधिकाधिक युवकांची भरती करण्याच्या उद्दिष्टांनं शासनानं अग्निवीर योजना आणली असून यात सतरा ते एकवीस वयोगटातले तरुण चार वर्षांच्या अल्पमुदतीच्या करारावर लष्करात सामील करून घेतले जातात.