नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौ-यावर जाणार आहेत. ते रियाझ इथं गुंतवणूक विषयक परिषदेत आपले विचार मांडतील. या भेटी मोदी सौदीचे राजे सलमान बीन अब्दुलअजीज अल सौद यांच्यासोबत द्विपक्षीय, तर युवराज मोहम्मद बीन सलमान यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तररावरची चर्चा करणार आहेत.

युवराज सलमान यांनी मोदी यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील. मोदी यांची सौदी अरेबियाची ही दुसरी भेट आहे. या भेटीत दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनं अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

या भेटीदरम्यान महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर प्रस्तावित असलेल्या महत्वाकांक्षी रिफायनरी प्रकल्पाला, तसंच भारतातल्या पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांमध्ये सौदी अरेबियाच्या प्रस्तावित गुंतवणूकीला अंतिम स्वरुप दिलं जाईल, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातल्या आर्थिक संबंधविषयक विभागाचे सचिव टी.एस. कृष्णमुर्ती यांनी दिली आहे.