पिंपरी : बेजबाबदार आणि निर्ढावलेल्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारत पुणे पोलिसांनी रिक्षाचालकांना नियमांमध्ये आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक पोलिसांनी मात्र रिक्षाचालकांना खुलेआम मोकळीक दिल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. बेकायदा प्रवासी आणि गणवेश सक्ती याकडे वाहतूक पोलीस लक्ष कधी देणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात चौका-चौकात रिक्षांच्या रांगाच्या-रांगा लागलेल्या पहायला मिळतात. मात्र, त्यापैकी क्वचितच चालकांच्या अंगावर आरटीओ कार्यालयाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार गणवेश परिधान केलेला दिसून येतो.

बऱ्याच रिक्षा चालकांकडे बॅच नसून ते सर्सास रिक्षा चालवत असल्याचे पहावयास मिळते.

तर, मोठ्या प्रमाणात बेकायदा प्रवाशी वाहतूक, प्रवाशांना दमदाटी, मोठ्या प्रमाणात भाडेवसुली असेच प्रकार पहावयास मिळत आहेत. चौका-चौकात उभे असलेले वाहतूूक पोलीस याप्रकाराकडे दूर्लक्ष करतात. रिक्षाचालकांची दमदाटी सुरू असताना साधी मध्यस्थी देखील करण्याचे धारिष्ट्य पोलीस दाखवित नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली आहे.

‘अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तथा वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षा चालकांवर आम्ही कारवाई करतच आहोत. मात्र, गणवेश न घालणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई संदर्भात अद्याप कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. वरिष्ठांकडून सूचना मिळाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. अशी माहिती पिंपरी वाहतूक शाखा सहायक पोलीस निरिक्षक अमर वाघमोडे यांनी दिली.