नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला. यंदा अर्थसंकल्पाच्या प्रतींची छपाई करण्यात आलेली नसल्याने देशाचा हा पहिला डिजिटल अर्थसंकल्प आहे.
निर्मला सीतारामन यांनी यंदा तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प हा आरोग्य आणि सुबत्ता, भौतिक आणि आर्थिक भांडवल तसेच पायाभूत सुविधा, आकांक्षी भारतासाठी समावेशक विकास, मनुष्यबळाला पुनर्संजीवनी, नवोन्मेष आणि संशोधन आणि विकास तसेच किमान सरकार, कमाल प्रशासन या ६ मूलभूत तत्वांवर आधारलेला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या गोष्टींविषयी सांगायच्या तर ७५ वर्षांवरच्या निवृत्तीवेतन धारकांना पुढच्या आर्थिक वर्षापासून आयकर परतावा सादर करावा लागणार नाही.
याशिवाय प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वास्थ योजना त्यांनी या अर्थसंकल्पात सादर केली. तसेच नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा आणि नाशिक मेट्रोसाठी चांगली तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.