नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील तैनात असणाऱ्या भारतीय जवानांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दिवाळी साजरी केली.  यावेळी बोलताना प्रधानमंत्र्यांनी भारतीय संरक्षण दलांची प्रशंसा केली.

संरक्षण दलांच्या ताकदीवरच  अशक्य वाटणारे  निर्णय केंद्र सरकारनं घेतले आहेत असं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी लष्कराचं साहस आणि धैर्य महत्वाचं असून देशातल्या नागरिकांना उत्कृष्ट सेवा देत असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलांचे आभार मानले.

नवी दिल्लीतल्या युद्धस्मारकाला नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. हे देशातल्या नागरिकांना संरक्षण दलांप्रति नितांत आदर असल्याचं द्योतक आहे, असं त्यांनी सांगितलं. संरक्षण दलाला अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी यांनी दिली.

राजौरीहून परतताना नरेंद्र मोदी यांनी पठाणकोट वायुसेना केंद्रावर हवाईदल कर्मचाऱ्यांशी आणि लष्कराच्या जवानांशी संवाद साधला. काल प्रधानमंत्र्यांचा दौरा असतानाच ७३ वा पायदळ दिवसही होता.

२७ ऑक्टोबर १९४७ रोजी भारताच्या एकत्रीकरणाला विरोध करत जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी  शक्तींविरोधात पायदळानं मोलाची कामगिरी बजावली होती.