नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा आणि पक्षाच्या अध्यक्ष पदी कायम रहावे, असा एकमुखी ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा निर्णयासाठी नेमण्यात आलेल्या समितीनं मंजूर केला आहे. त्यामुळे आता या ठरावावर शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात अध्यक्ष निवड समितीची बैठक सुरू झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे असा ठराव बैठकीत मांडला. उपस्थित सर्व १७ नेत्यांनी या प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा दिला. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, देशाला आणि पक्षाला सध्या अनुभवी राज्यकर्त्याची आवश्यकता असून आम्ही त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती.
महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यांमधूनही शरद पवार यांच्यासारख्या धोरणी आणि कार्यतत्पर नेत्याची आवश्यकता असल्याचे फोन येत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी राजीनामा ठराव वाचून दाखवला.