नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व प्रमुख राजकीय पक्ष एकमेकांवर, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आणि मोठमोठी आश्वासनं देत असल्याचा आरोप करत आहेत. राज्यात प्रचाराची रणधुमाळी पुढचे दोन दिवस सुरू राहणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरूमध्ये आज रोड शो केला. यावेळी समर्थकांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. मोठ्या संख्येने लोक रोड शो मधे सहभागी झाले होते. प्रधानमंत्री आज काही प्रचारसभांना संबोधित करणार आहेत.
७ मे रोजी होणाऱ्या NEET (नीट) परीक्षेच्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी बेंगळुरूमध्ये प्रधानमंत्र्यांच्या रोड शोच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आज हुबळी मध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतली त्यांची ही पहिलीच जाहीर सभा असेल. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील आज पक्षाचा प्रचार करणार आहेत.