मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवीनगर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंती उत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात चौंडी इथं आयोजित  कार्यक्रमात ते बोलत होते. अहिल्यादेवी होळकर यांनी समाजातल्या सर्व स्तरातल्या जनतेच्या कल्याणासाठी काम केलं. प्रशासकीय कारभाराचा उत्तम धडा त्यांनी दिला, असं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे  आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्याच्या १४ तालुक्यातल्या महिलांना राजमाता अहिल्यादेवी सन्मान प्रदान करण्यात आला. अहिल्यादेवी महामंडळाला राज्य सरकारच्या वतीने दहा कोटी रुपये देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले सरकारने धनगरांसाठी विविध योजनांना मंजुरी दिली  आहे. विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी केली होती.

चौंडी हे आहिल्याबाई होळकरांचं जन्मगाव असून तिथं जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आहिल्याबाईंच्या प्रतिमेला काल मध्यरात्रीनंतर १ वाजता  सात नद्या आणि बारवातल्या पाण्याने अभिषेक करण्यात आला. त्यांनतर पहाटे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी अहिल्याबाई होळकर यांची पूजा केली.