मुंबई (वृत्तसंस्था) : 5 जून,अर्थात जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं 1973 पासून जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. “प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखा” ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. पुण्यातील पर्यावरण तज्ञ डॉक्टर सचिन पुणेकर यांनी यानिमित्तानं केलेलं हे आवाहन पर्यावरण साक्षरता ही आपण अंगी बाणवली पाहिजे आज आपण बघतोय की लोकाभिमुख विकास हा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात या लोकाभिमुख विकासाच्या माध्यमातून नुकसान होताना आपल्याला पदोपदी दिसतंय. त्यामुळे निसर्गाला केंद्रित ठेवून जर शाश्वत पद्धतीचा विकास धोरणकर्त्यांनी अवलंबला तर ते कदाचित सर्वांच्या हिताचं होईल असं मला नमूद करायचं आहे. किंवा एकंदरीत नैसर्गिक अधिवासामध्ये जो मानवाचा चुकीचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये आहे वाढतोय याच्यामुळे कळत नकळत का होईना पण मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय आणीबाणी ही आपल्या समाजावर आली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि यासाठी आपल्याला जनमानसामध्ये किंवा समाजातील विविध घटकांमध्ये योग्य ती पर्यावरण साक्षरता सजगता अंगी बनवणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला समाजातील विविध घटकांमध्ये पर्यावरणाची विविध अंगं किती महत्त्वाची आहे आणि त्याच्याविषयीचा जागर पर्यावरणाचा, करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. पर्यावरण टिकलं आपल्या सभोवतालचे अधिवास निसर्गसृष्टी जीवसृष्टी जर टिकली मात्र याची दखल जनसामान्यांनी घ्यावी अस आवाहन मी या ठिकाणी करेन. वैश्विक पातळीवर अनेक हवामानाचे बदल होत आहेत आणि  त्याचा थेट परिणाम हा जीवसृष्टीवर असेल आणि तो मानवालाही असेल आणि यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे आणि हा लढा सगळ्यांनी एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे.

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यानं सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात जिल्ह्यासह बारामती, लोणावळा आणि  माळेगावचा सन्मान करण्यात येणार आहे.  बारामती आणि लोणावळा नगर परिषदांनी 50  हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या गटात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, तर माळेगाव नगर पंचायतीनं 25 हजार ते 50 हजार लोकसंख्येच्या गटात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पुणे जिल्ह्यानं अभियानात चांगली कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनाही या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.  निसर्गाशी संबंधित भूमी, जल, वायु, आकाश आणि अग्नी या पंचतत्वांच्या निकषांवर ही स्पर्धा घेतली जाते. पुणे जिल्ह्यानं गेल्या वर्षीही या अभियानात चांगली कामगिरी केली होती.