नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे यांच्यासह काही इतर मागासवर्गीय जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी नवी दिल्ली इथं महाराष्ट्र सदनात आयोजित वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
गेल्या सहा महिन्यांत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं केलेल्या कामांची माहिती दिली. यामध्ये राज्यातल्या, ओबीसीमध्ये असणाऱ्या काही जातींना केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय मागासवर्ग वित्त महामंडळानं आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1 लाख 94 हजार 810 लाभार्थ्यांना 678 कोटी 5 लाख रूपयांच्या वार्षिक कार्य योजनेला कार्य मंजुरी दिली.
विद्यापीठांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ही वाढ वर्ष 2014-15 च्या तुलनेत 2020-21 मध्ये 32 पूर्णांक 6 टक्के इतकी आहे. याच कालावधीत विद्यार्थींनींच्या संख्येत 40 पूर्णांक 4 शतांश टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती अहीर यांनी दिली.