मुंबई (वृत्तसंस्था) : नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये अद्याप कोणताही तोडगा दृष्टीपथात नाही. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी मुंबईत सेनाभवन इथं बैठक झाली.

गटनेते पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला. हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला. तसंच सुनील प्रभू यांची विधानसभेतील पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली. आगामी सरकारमधला सहभाग आणि सत्तावाटप याबाबत सेना-भाजप महायुतीतल्या मित्रपक्षांची बैठकही झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्ग काढून लवकर सत्ता स्थापन करावी आणि  रिपाइं, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांतीला प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रिपद  म्हणजे चार मंत्रीपद द्यावीत अशी मागणी रिपाईचे प्रमुख रामदास आठवले यांनी केली आहे.

या बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते, काँग्रेसचा गटनेता या बैठकीत निवडला जाणार होता मात्र ही निवड  झाली नाही.

दिल्लीवरून काँग्रेसचे दोन निरीक्षक येणार आहेत, त्यानंतर गटनेता निवडला जाईल अशी माहिती खर्गे यांनी यावेळी दिली.  त्यापूर्वी आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.