नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४४ वी जयंती देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. २०१४ पासून पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जाते.

यानिमित्तानं देशात ठिकठिकाणी एकता दौडचं आयोजन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये केवाडिया इथं स्टॅचू ऑफ युनिटी इथं जाऊन वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली, त्यानंतर ते केंद्रीय सुरक्षा दलांच्या आणि गुजरात पोलिसांच्या एकता दिवस संचलनाला उपस्थित राहतील.

प्रधानमंत्री तंत्रज्ञान प्रदर्शनालाही भेट देणार असून केवाडियामधल्या नागरी सेवा प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत. प्रधानमंत्री कार्यालयानं ही माहिती दिली आहे. रविवारी झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकता  दौडमध्ये मोठ्या संख्येनं भाग घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं  होतं. हे एकतेचं प्रतीक असून ”एक भारत श्रेष्ठ भारत” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देश एकाच दिशेनं सामूहिक रूपात पुढे जात आहे, हे एकता दौडच्या माध्यमातून दिसून येतं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं.

‘मन की बात’ या कार्यक्रमाची घोषणा प्रधानमंत्र्यांनी ३१ ऑक्टोबर २०१५ ला वल्लभाई पटेल यांच्या जयंतीच्याच दिवशी केली होती. प्रधानमंत्री काल रात्री अहमदाबाद इथं पोहोचले. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री विजय रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं.

राजधानी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. एकता दौड मध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीनं नागरिकांच्या सोयीसाठी दिल्ली मेट्रोनं आपली सेवा आज सकाळी चार वाजल्यापासून सुरु केली.

सरदार वल्लभभाई पटेल यांचं  भारतासाठीचं योगदान अमूल्य आहे, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली.