नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथुर यांचा आज लेह इथं सिंधु संस्कृत केंद्रात शपथविधी झाला.

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या शपथविधीनंतर गीता मित्तल विमानानं श्रीनगर इथं रवाना होतील. तिथे त्या जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या गिरीशचंद्र मुरमू यांना पदाची शपथ देतील.

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही राज्यपालांचे शपथविधी होत आहेत. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 नुसार जम्मू आणि काश्मीर राज्याचं अस्तित्व मध्यरात्रीपासून संपुष्टात आलं.

पाच ऑगस्टला संसदेनं जम्मू आणि काश्मीरचं विभाजन करण्याचा निर्णय घेतल्यावर हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करणारं राज्यघटनेतलं कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णयही संसदेनं याच दिवशी घेतला. आता देशात राज्यांची संख्या 28 झाली असून केंद्रशासित प्रदेशांची संख्या वाढली असून आता नऊ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत.

दरम्यान, हिमालयाच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी लडाख इथं जी बी पंत हिमालयन पर्यावरण आणि विकास संस्थेची स्थापना करायला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंजुरी दिली.