नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण ही केवळ शिकवण्याची नव्हे तर शिकण्याचीही प्रक्रिया आहे. इतके वर्ष विद्यार्थ्यांना काय शिकवायचे यावर शैक्षणिक धोरणाचं लक्ष केंद्रीत होतं. पण आता आम्ही विद्यार्थी काय शिकू इच्छितात याकडे लक्ष वळवल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्ली विद्यापीठाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण लागू केले. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार विषयांची निवड करु शकतात. आजकालचे विद्यार्थी पदवीशिवाय नवी काही करु इच्छितात. त्यांच्या आवडीनिवडीला व्यवसाय बनवण्याची संधी त्यांना मिळेल, असं प्रधानमंत्री म्हणाले. भविष्यकेंद्री धोरण आखल्यामुळं भारतीय विद्यापीठांना आता जगभरात सन्मान मिळत आहे, असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज विद्यापीठाच्या कम्प्युटर केंद्र, तंत्रज्ञान विभाग तसंच शैक्षणिक इमारतीचं भूमीपूजन केलं.