नवी दिल्ली : टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 साठीच्या भारतीय शिष्टमंडळाची चित्रपट उद्योगातल्या विविध मान्यवरांशी आणि महोत्सवाशी संबंधित व्यक्तींशी चर्चा सुरु आहे. चित्रपट महोत्सव महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक चैतन्य प्रसाद, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या उपसचिव धनप्रीत कौर यांचा समावेश असलेल्या भारतीय प्रतिनिधीमंडळानं बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. बर्लिन 2020 महोत्सवात भारताचा सहभाग वाढविण्यासाठीच्या पर्याय आणि शक्यता यावेळी पडताळण्यात आल्या.
भारतात चित्रीकरणासाठी सुलभता आणण्याच्या दृष्टीने चित्रपट क्षेत्रासाठीच्या धोरणात्मक बदलाची, बर्लिनच्या प्रतिनिधीमंडळाला माहिती देण्यात आली. मंजुरीसाठीच्या एक खिडकी योजनेचीही यावेळी माहिती देण्यात आली.
भारताच्या शिष्टमंडळाने, बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या विपणन आणि जाहिरात विभागाच्या प्रमुखांची भेट घेतली. तसेच बर्लिन चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांचा सहभाग अधिक वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने या महोत्सवाच्या कार्यकारी संचालकांची भेट घेतली. महोत्सवाचा सृजनशील आणि कला विभाग या संदर्भात लक्ष घालेल असे आश्वासन त्यांनी दिले.
टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सह प्रमुख आणि कार्यकारी संचालक जोन व्हिसेंटी यांनी या महोत्सवातल्या भारतीय पॅव्हेलियनला भेट दिली. 50 व्या इफ्फीची त्यांनी प्रशंसा केली.