नवी दिल्ली : पद्म पुरस्कार-2020 साठी नामांकन किंवा शिफारस पत्र पाठवण्यासाठीची प्रक्रिया 1 मे 2019 पासून सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 15 सप्टेंबर 2019 पर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत जनता पद्म पुरस्कारांसाठी नामांकने पाठवू शकते.
पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री हे देशातले सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला या पुरस्कारांची घोषणा केली जाते. कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, समाजसेवा, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक काम, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या अथवा कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान केले जातात. डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ वगळता सरकारी कर्मचारी, सार्वजनिक कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी या पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.
पद्म पुरस्कारांसाठीची नामांकने केवळ ऑनलाईन स्वरुपातच स्वीकारली जातील. पद्म पोर्टलच्या www.padmaawards.gov.in. या संकेतस्थळावर ही नामांकने पाठवता येतील. देशातला कोणीही व्यक्ती पद्म पुरस्कारांसाठी स्वत: सकट इतर कोणाच्याही नावाची शिफारस करु शकतो. या नामांकनासोबतच संबंधित व्यक्तीच्या कार्याची संपूर्ण माहिती विहित नमुन्यामध्ये भरुन पाठवणे आवश्यक आहे. ज्यात व्यक्तीचे कार्यक्षेत्र आणि त्यात दिलेली सेवा या विषयी सविस्तर माहिती लिहिली जावी.
केंद्र सरकारमधील सर्व मंत्रालये, विभाग तसेच सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या भागातील गुणवान व्यक्ती विशेषत: महिला, दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती तसेच दिव्यांग व्यक्ती ज्यांचे असामान्य कतृत्व आहे आणि जे या पुरस्कारासाठी पात्र आहेत त्यांची माहिती गृह मंत्रालयाकडे पाठवावी असे आवाहन मंत्रालयाने केले आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.