नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम झाला आहे, असं प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलं आहे. मॉस्कोमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे सांगितल्याचं रशियाच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. रशियात देशी बनावटीच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत प्रतिपादन करताना पुतिन यांनी भारताचं उदाहरण दिलं. मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडियाची संकल्पनी मांडली आणि त्याचे आता दृश्य स्वरूपात परिणाम दिसू लागले आहेत, असं पुतिन म्हणाले.यापूर्वी रशियाचे राजदूत डेनिस अलिपॉव्ह यांनीही नवी दिल्लीत बोलताना रशिया आणि भारतातील धोरणात्मक भागिदारी सुदृढ झाल्याचं नमूद केलं आहे.

रशिया आणि भारताच्या संबंधांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. उभय देशांच्या भागिदारीला मोठं बळ मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. दरम्यान, रशियातील खासगी लष्कराचं बंड अयशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सल्लागार निकोलाई पात्रुशेव्ह यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी काल दूरध्वनीवरून चर्चा केली आणि देशातील ताज्या घडामोडींची माहिती दिली. भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांबाबतही त्यांनी संवाद साधला. शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद आठवड्याभरात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड उल्लेखनीय मानली जात आहे.