मुंबई : ग्राहकांना सीएनजी (क्रॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) या इंधनाचा नियमितपणे पुरवठा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी खबरदारी घेण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिल्या. मंत्रालयात आयोजित सीएनजी पुरवठ्याबाबतच्या आढावा बैठकीत मंत्री श्री.चव्हाण यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, वितरक प्रतिनिधी उपस्थित होते.

पुरवठादार आणि वितरक यांनी जनतेची, ग्राहकांची  गैरसोय होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेऊन सीएनजीचा विनाखंड पुरवठा उपलब्ध करुन देण्याची खबरदारी घ्यावी. सीएनजी हे अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २००६ तसेच सीएनजी चे उत्पादन, पुरवठा व वितरण हे अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा, १९८१ (ESMA) च्या कलम २ (xii) अंतर्गत अत्यावश्यक सेवेच्या कक्षेत येतात. या बाबी लक्षात घेऊन सीएनजी पुरवठा सुरळीत होण्यासाठीची कार्यवाही तसेच इंधनाच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कार्यवाही देखील संबंधित यंत्रणांनी करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी दिल्या.