नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेस, द्रमुक, जनतादल संयुक्त आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली. मणिपूर हिंसाचाराविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सभागृहात निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा ते देत होते. त्या गदारोळातच प्रश्नोत्तरांचा तास रेटण्याचा प्रयत्न सभापती ओम बिरला यांनी केला. शांततेनं सभागृहाचं कामकाज चालवावं, या समस्येवर घोषणाबाजीने नव्हे, तर चर्चेद्वारे तोडगा मिळू शकतो असं बिरला यांनी सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. गदारोळामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेत मणिपूर हिंसाचारासंदर्भात विरोधकांनी नियम 267 अन्वये मांडलेले अनेक स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले. राजस्थान आणि छत्तीसगढमधे महिलांवर अत्याचार झाल्याच्या मुद्द्यावर भाजपा खासदारांकडून प्राप्त झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार आहे, महिलांवर अत्याचार हा संवेदनशील विषय असून त्याचं राजकारण करु नये असं सभागृह नेते पीयुष गोयल यांनी सांगितलं. नियम 176 अन्वये मांडलेल्या मुद्द्यावर अल्पकालीन चर्चा होते त्यामुळे या मुद्दयाचं गांभीर्य ओळखून 267 अन्वयेच चर्चा घ्यावी अशी विनंती काँग्रेसचे पी. चिदंबरम यांनी केली. दोन्ही बाजूने घोषणा प्रतिघोषणा चालू राहिल्यामुळे अध्यक्ष धनखड यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही गदारोळ चालूच राहिला आणि अध्यक्षांनी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं.