मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा-शिवसेना युतीचच सरकार येत्या १० नोव्हेंबरच्या आधी स्थापन होईल आणि सहा किंवा सात नोव्हेंबरला या सरकारचा शपथविधी होईल असा विश्वास भाजपाचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. ते चंद्रपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

जनतेनं भाजपा-शिवसेना युतीलाच कौल दिला असून, हा कौल  मान्य करून दोन्ही पक्षांनी त्याचा आदर करावा, मंत्रीपदांच्या वाटपाचा तिढा चर्चेतून सोडवता येईल असं ते म्हणाले. ठराविक मुदतीत सरकार स्थापन झालं नाही तर संविधानात असलेला राष्ट्रपती राजवटीचा पर्याय आपण फक्त निदर्शनाला आणून दिला, त्यासाठी शिवसेनेनं रागावू नये असा खुलासाही त्यांनी केला.

आम्हाला राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नका, या शिवसेनेनं त्यांच्यावर केलेल्या टीकेला ते उत्तर देत होते. आपण वनमंत्री असल्यामुळे वाघाची समजूत कशी काढायची हे आपल्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असून, वाघ आमच्या सोबतच असेल अशी टिप्पणीही मुनगंटीवार यांनी केली.