‘सारथी’ संस्थेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

मुंबई : ‘सारथी’ संस्थांतर्गत स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन दिले जाते. परंतू फेब्रुवारी महिन्यात दिले जाणारे विद्यावेतन अजूनही मिळाले नसल्याने ‘सारथी’ संस्थेचे विद्यार्थी नवी दिल्ली येथे आंदोलन करीत होते. बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरध्वनीवरुन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना तीन दिवसातच विद्यावेतन देणार असल्याची ग्वाही दिली.

श्री.वडेट्टीवार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ‘सारथी’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक-शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सारथी’ या संस्थेकडून दिले जाणारे विद्यावेतन फेब्रुवारी महिन्यात अजूनही मिळाले नसल्याने दिल्लीत 225 लाभार्थी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यांनी आज आंदोलन सुरु केले होते.

श्री.वडेट्टीवार यांनी आज तातडीने विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून तीन दिवसातच रक्कम खात्यात जमा करण्याचे निर्देश ‘सारथी’च्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.