मुंबई : शैक्षणिक वाटचालीमध्ये दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा असतो. उच्च शिक्षणात पदार्पण करण्यासाठी बारावीची परीक्षा ही महत्त्वाची पायरी आहे. उद्यापासून  सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा देणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा  दिल्या आहेत.

श्री. सामंत यांनी संदेशात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेला इतर परीक्षेसारखेच पहावे. वर्षभर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे, त्यामुळे आता काहीही चिंता करू नका, नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. अगदी सकारात्मक ऊर्जेने या परीक्षेला सामोरे जा!

परीक्षेदरम्यान कोणत्याही गैरप्रकाराला समर्थन देऊ नका. सकारात्मकपणे या परीक्षेला जा. परीक्षेला जाताना ओळखपत्र, परीक्षेची वेळ, परीक्षा स्थळ, हॉल तिकीट, पेन आणि आवश्यक ते शैक्षणिक साहित्य याचे आजच नियोजन करून ठेवा. विशेष म्हणजे सगळ्यांनी सकाळी योग्य तो आहार करून परीक्षेला जावे, असेही नमूद केले आहे. आपण यशस्वी व्हाल, या विश्वासासह विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.