मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या पावसाळ्यात राज्यात विविध प्रकारच्या आपत्तींमुळं १०१ जणांचा मृत्यू झाला आहे, १३ लोक बेपत्ता असून १२३ जण जखमी झाल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागानं दिली आहे. गेल्या २४ तासात कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पावसामुळं राज्यातले २६ हजारांहून अधिक नागरिक बाधित झाले त्यांच्यासाठी २५ मदत छावण्या उभारल्या आहेत.
या पावसाळ्यात १२६ जनावरांचा मृत्यू झाला आहे, २ घरांचं पूर्ण तर ४६४ काही प्रमाणात नुकसानग्रस्त झालंय. राज्यातल्या आपत्तीग्रस्तांना देण्यात येणाऱ्या तातडीच्या अनुदानाची रक्कम दुप्पट म्हणजेच प्रति कुटुंब १० हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंत तर टपरीधारकांना १० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.
ही वाढीव मदत यंदाच्या जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान दिली जाईल. नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीत दुकानदारांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नव्हती. मात्र आता दुकान पाण्यात बुडाले तर किंवा वाहून गेले किंवा संपूर्ण नुकसान झाले तर दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे आणि जे रेशनकार्ड धारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
टपरीधारकांना सुद्धा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपये पर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल. दुकानदारांप्रमाणेच त्यांनाही पात्रतेच्या अटी लागू असतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केवळ पाहणी न करता त्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज केली.