मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार स्थापन केला असून हा पहिलाच पुरस्कार जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना देण्याचा निर्णय झाल्याची माहिती अशी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासह तरुण, महिला आणि मराठी उद्योजकांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, यामुळे उद्योग जगतात महत्वाचं स्थान अधोरेखित होईल असं त्यांनी सांगितलं.

राज्यातल्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याच्या दृष्टीनं, उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मैत्री कक्षाच्या कार्यवाहीत सुधारणा करणारं महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं. सरकारनं केलेल्या उपायोजनांमुळे गेल्या ११ महिन्यात राज्यात १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकांचं राज्य बनलं आहे असं सामंत यांनी सांगितलं.

मागच्या काळात उद्योगधंदे राज्याबाहेर का गेले यासंदर्भात याच अधिवेशनात श्वेतपत्रिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाख रुपयांची मदत दिली जात होती. ती वाढवून २५ लाख रुपये देण्याचा निर्णय करण्यात येत आहे, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या संदर्भातले विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.