नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल नागपूर इथं केलं. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेच्या ७६ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी प्रणिती या व्याख्यानमालेचं उद्घाटन उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
प्रशिक्षणार्थीं महसूल अधिका-यांना समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या भावी भूमिकेसाठी त्यांना सज्ज करण्यासाठी ‘प्रणिती’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, उपराष्ट्रपतींच्या पत्नी डाॅक्टर सुदेश धनखड, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, मुख्य महासंचालक वसुंधरा सिन्हा उपस्थित होते.