नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाप्रमाणेच विद्यापीठ सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते सिक्कीम विद्यापीठाच्या ५ व्या पदवीदान समारंभात बोलत होते.
शैक्षणिक संस्थानी आपल्या विद्यार्थ्यांना गाव पातळीवर पाठवून लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असं ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, आरोग्य, लसीकरण, शिक्षण आणि पोषक आहार या बाबींच्या वाढीसाठी लोकांबरोबर काम करावं, असं ते म्हणाले. हे साध्य करण्यासाठी विद्यापीठांनी आपल्या परिसरातील गावं दत्तक घ्यावी, असं आवाहन कोविंद यांनी केलं.
केवळ एक व्यावसायिक नव्हे तर एक चांगला माणूस बनणं हे शिक्षणाचं एकमेव ध्येय आहे, असं कोविंद यांनी म्हटलं आहे. महिला सबलीकरण, सांस्कृतिक परंपरांचं जतन विशेष करुन लेपचा, भूतिया आणि लिंबू तसंच धोक्यात असलेल्या विविध भाषांचं जतन करण्यात सिक्कीम विद्यापीठानं बजावलेल्या भूमिकेचं राष्ट्रपतींनी कौतूक केलं.