नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं १०० टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या गाडीचं अनावरण केलं. जगातलं पाहिलं फ्लेक्स-इंधनावर चालणारं विजेचं वाहन सुरु करून देशानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवल्याचं ते यावेळी म्हणाले. देशाची तेल आयात सध्या १६ लाख कोटी रुपये इतकी असून, भारताला स्वावलंबी देश बनवण्यासाठी तेलाची आयात शून्यावर यायला हवी, असं ते म्हणाले. देशातल्या एकूण प्रदूषणापैकी ४० टक्के वाटा केवळ वाहतूक क्षेत्राचा असून, ही मोठी चिंतेची बाब आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आपण अधिक शाश्वत उपाययोजना करायला हव्यात असं ते म्हणाले. पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणामुळे देशाच्या कृषी क्षेत्राचा विकास १२ टक्क्यावरून २० टक्के इतका वाढेल, आणि त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील असं गडकरी म्हणाले. २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या अंमलबजावणीमुळे भारताच्या आयातीच्या खर्चात वर्षाला ३५ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी यावेळी सांगितलं.